My Blog List

Tuesday 18 March 2014

अंबा-अंबिका लेणीसमूह (Amba-Ambika Caves)



लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो. एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. ‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत. पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत. आतले खोदकाम खडक ठिसूळ लागल्याने सोडून दिले आहे. लेणे अपूर्ण राहिले, पण बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक खंडित शिलालेख या लेण्यामागील कुणा भावांच्या दानधर्माची माहिती मिळते.
यानंतर पुन्हा काही खोल्या वजा लेणी आणि पाण्याची कुंडे लागतात. त्याच्या डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.

वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले.
मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात.
हा सारा इतिहास आहे. कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात. या स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे.
या दुमजली लेण्यांच्या पुढे या गटातील चैत्यगृह आहे. त्याच्या दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह! पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले.

या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा.
दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!
या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत..

‘गामे वलाहकेसुकर
जभति उदेसेण निवत
णानि बारस।। गामसे
उरकेसु निवनणानि’

हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.

चैत्यगृहातील या ब्राह्मी शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!
या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा-

‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं
अससमस पुताण
बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’

अर्थ- भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात.
- जुन्नर निसर्ग पर्यटन

No comments:

Post a Comment